नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. मागील २४ तासांत कोविड १९ चे ५८ टक्क्याहून जास्त रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. केरळ हे एकमेव राज्य आहेत ज्याठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या १ लाखाहून जास्त आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या ४ राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजार ते १ लाखाच्या दरम्यान आहे अशी मागिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहे. दुसरी लाट संपली नाही. त्यामुळे लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे. विशेषत: सण-उत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिना देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळात देशात अनेक ठिकाणी उत्सव आहेत. त्यामुळे कोविडचे नियम पाळूनच उत्सव साजरे केले पाहिजेत असं आवाहन त्यांन केले.
तसेच कोविड १९ विरुद्ध लसीकरण हे कोरोना प्रसार रोखण्यासाठी आहे. रोग बरा करण्यासाठी नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसचे ४६ हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर भारतातील कोविड १९ एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २५ लाख ५८ हजार ५३० झाली आहे. सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार ६०७ लोकांच्या मृत्यूनंतर देशभरात मृतांची संख्या ४ लाख ३६ हजार ३६५ इतकी झाली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या
केरळ आरोग्य विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ३१ हजार ४४५ रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णसंख्या ३८ लाख ८३ हजार ४२९ इतकी झाली आहे. २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये शनिवारी १७ हजार १०६, रविवारी १० हजार ४०२, सोमवारी १३, ३८३ आणि मंगळवारी २४ हजार २९६ कोरोना रुग्ण आढळले आहेत.