नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. आताच्या परिस्थितीत कोरोना होऊच नये, यासाठी प्रार्थना केली जातेय. मात्र, चुकून कोरोना झाला, तर रुग्णालयात भरती होण्याची वेळ येऊ नये, यासाठी लोकं प्रार्थना करताना दिसत आहेत. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परंतु, या परिस्थितीत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने एक, दोन नाही, तर तब्बल ४ वेळा कोरोनावर मात केली आहे. इतकेच नव्हे, तर कोरोनामुक्तीनंतर दोनवेळा पाझ्मादान केल्याचे समजते. (coronavirus yogendra baisoya who beat corona 4 times and donated plasma twice)
दिल्लीतील कोटला भागात असलेल्या मुबारकपूर येथील खैरपूर गावात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. योगेंद्र बैसोया नामक तरुणाने देशासमोर एक आदर्श ठेवला असून, कोरोनाला निश्चित पराभूत केले जाऊ शकते, याचा परिपाठ त्यांना घालून दिल्याचे सांगितले जात आहे. कोरोना झाल्यावर घाबरून न जाता सकारात्मकता अंगी बाणवून त्याने कोरोनाला चारवेळा पराभूत करण्याचा भीमपराक्रम केला आहे.
पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका
४ वेळा कोरोनामुक्त आणि पाझ्मादान
एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर योगेंद्र यांना दुसऱ्यांदा कोरोनाने गाठले. यावेळी कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दुसऱ्यांदा कोरोना झाल्यावर योगेंद्र यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवावे लागले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. चौथ्यावेळी योगेंद्र यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यावर काही झाले, तरी रुग्णालयात भरती न होण्याचा निश्चय त्यांनी केला होता आणि घरीच राहून ऑक्सिजन सपोर्टशिवाय कोरोनावर मात केल्याची माहिती मिळाली आहे. योगेंद्र यांना चौथ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांचे कुटुंबीय अत्यंत चिंताग्रस्त झाले होते. मात्र, कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोना होऊ नये, म्हणून त्यांना नातेवाइकांकडे पाठवण्यात आले होते. याशिवाय कोरोनामुक्त झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून योगेंद्र यांनी दोनवेळा पाझ्मादानही केले.
...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा
कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे अनेकदा लागण
योगेंद्र सेक्युरिटी इंजिनिअर असून, आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. कोरोनाचे नियम योग्य पद्धतीने न पाळल्यामुळे अनेकदा कोरोना झाल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षीच्या जून महिन्यात त्यांना पहिल्यांदा कोरोना झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समजले. दोनवेळा कोरोनामुक्त झाल्यानंतर यंदाच्या जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा कोरोना झाला होता आणि गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये योगेंद्र यांना चौथ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. मात्र, चारही वेळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कोरोनावर मात केली.