लखनऊ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या घरात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला गती दिली जात आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरणाचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे डॉक्टरांसह सगळ्यांनाच धक्का बसला आहे.लखनऊत एका व्यक्तीनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले. मात्र तरीही त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत. वैद्यकीय विद्यापीठाच्या रक्तसंक्रमण विभागानं केलेल्या सर्वेक्षणात एकूण ७ टक्के व्यक्तींच्या शरीरात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँटिबॉडी तयार न झाल्याची माहिती समोर आली. या चाचण्यांमुळे डॉक्टरदेखील चकीत झाले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती का वाढली नाही यासाठी आता संशोधन करण्यात येत आहे.कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, लागण झाल्यास गंभीर आजारांचा धोका, पण...किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या रक्तसंक्रमण विभागात काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यातील एँटिबॉडी तपासण्यात आल्या. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे स्क्रिनिंग करण्यात आलं. आतापर्यंत जवळपास १ हजार लोकांच्या अँटिबॉडीज तपासण्यात आल्या आहेत. तर अद्याप ४ हजार जणांची वैद्यकीय चाचणी बाकी आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ७ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडी तयार न झाल्याचं चाचणीतून समोर आलं. यासंदर्भात अधिक संशोधन करण्याची गरज रक्तसंक्रमण विभागाच्या प्रमुख तुलिका चंद्रा यांनी व्यक्त केली.
CoronaVirus News: दोन डोस घेऊनही तयार झाल्या नाहीत अँटिबॉडी; स्क्रिनिंग टेस्टमधून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:37 AM