- मुकेश मिश्राइंदूर : गेली चार वर्षे देशामधील सर्वांत स्वच्छ शहर असा किताब मिळविलेल्या इंदूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार, वयोवृद्ध लोकांना गोळा करून त्यांना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रचंड थंडीत वाऱ्यावर सोडून दिले. या अमानुष कृत्याची व्हिडिओफित समाजमाध्यमावर झळकली असून, त्यामुळे खळबळ माजली आहे. राजेश जोशी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणी उपायुक्त प्रताप सोळंकी यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, सुपरवाइझर बृजेश लश्करी व विश्वास बाजपेयी यांना बरखास्त करण्यात आले आहे. या वयोवृद्धांना कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला नेवून टाकण्याचे कृत्य करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा क्षिप्रा परिसरातील गावकऱ्यांनी निषेध केला, तसेच या वयोवृद्धांना परत शहरात आणण्याची मागणी केली. महामार्गाच्या लगत थांबविलेल्या एका ट्रकमधून महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार वयोवृद्धांना खाली उतरविले व रस्त्याच्या कडेला सोडून दिले. त्या प्रसंगाचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांपैकी काही जणांनी चित्रीत केला. त्यामुळे या घटनेला वाचा फुटली आहे. या निराधार लोकांना त्यांच्या सामानासुमानासह कशा प्रकारे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आले, याची कहाणी एक स्थानिक नागरिक आणखी एका व्हिडिओत सांगत आहे.
मानवतेवरील कलंक काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका करताना ट्वीट केले आहे की, हा मानवतेवरील कलंक आहे. अभिनेते सोनू सूद यांनी या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली. महापालिकेने आरोप फेटाळले इंदूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभय रांजणगावकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, महापालिका कर्मचारी बेघर, निराधार वयोवृद्धांना निवारा छावणीमध्ये नेत होते. मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांना जसे दूर सारले तसेच भाजपचे लोक इंदूरमधील वयोवृद्धांशी वागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.