चंडीगड - प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात यावरून प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयितांना अटकही केली आहे. मुसेवाला हत्याकांडाचे पुणे कनेक्शनही समोर आले आहे. यातच आता, काँग्रेसआमदारालाही थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुधरा, अन्यथा तुमचाही मुसेवाला करू, अशी धमकी काँग्रेसआमदाराला देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाबमधील मानसा येथे जाऊन सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, पंजाबमधील आप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अलीकडेच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. देशात मुसेवाला यांच्या हत्येची चर्चा होत असतानाच आता हरयाणाच्या काँग्रेस आमदारालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हरयाणाचे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि आदमपूरचे आमदार कुलदीप बिश्नोई यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुधर जा, वरना मुसेवाला के साथ जो हुआ, वो तेरे साथ होगा... असा मसेज त्यांच्या मोबाईलवर आला आहे. याप्रकरणी आदमपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिश्नोई यांचे खासगी सचिव भूप सिंह मंडी यांनी फिर्याद दिली असून, व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे कुलदीप बिश्नोई यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी तक्रारी म्हटलं आहे. पोलिसांनी भादंवि 506 आणि आयटी अॅक्टच्या कलम 67 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हरयाणामध्ये जाट आणि गैरजाट यांच्या राजकारणाचा मोठा इतिहास आहे. कुलदीप बिश्नोई यांना राज्यातील प्रमुख गैर जाट मानले जाते.
राहुल गांधींचा आपवर निशाणा
राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधील आप सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंजाबमधील मानसा गावात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे ते सिद्धू कुटुंबासोबत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग, प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री अंबिका सोनी उपस्थित होते.