गुजरातच्या अहमदाबादमध्ये भ्रष्टाचार आणि महागाईचा अद्भूत नमुना समोर आला आहे. २०२२ पासून जर्जर अवस्थेत असलेला हाटकेश्वर पूल तोडण्याचे काम येत्या १५ दिवसांत सुरु केले जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे पूल निर्माण केल्याच्या ५ वर्षांतच तो जर्जर झाला आहे. खर्चाचे म्हणाल तर हा पूल बांधण्यासाठी ४२ कोटींचा खर्च आला होता, तो पाडण्यासाठी आता ५२ कोटी रुपये लागणार आहेत.
अहमदाबाद महापालिकेने यासाठी चारवेळा टेंडर काढले होते. परंतू, दोनदा तर कोणत्याही कंत्राटदाराने यात स्वारस्य दाखविले नाही. तिसऱ्यांदा काढलेल्या टेंडरला महाराष्ट्राच्या एका कंत्राटदाराने भरले परंतू अखेरच्या क्षणी त्यानेही हात वर केले. यामुळे चौथ्यांदा पालिकेला टेंडर काढावे लागले असून राजस्थानच्या विष्णुप्रसाद पुंगलिया यांना ५२ कोटी रुपयांची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे.
२०१७ मध्ये अजय इन्फ्रा नावाच्या कंपनीने हा पूल बांधला होता. तेव्हा या पुलाचे आयुष्य १०० वर्षे असेल असा दावा या कंपनीने केला होता. परंतू, पुढील ५ वर्षातच या पुलाची पोलखोल झाली आणि याच्या मजबुतीवरून प्रश्न उपस्थित होऊ लागले. गेल्या दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कमी गुणवत्तेच्या साहित्याचा या पूल निर्माणासाठी वापर करण्यात आल्याचे विविध एजन्सींनी आपल्या अहवालात म्हटले आहे. या कंपनीला ब्लॅकलिस्टही करण्यात आले आहे. २०१७ मध्ये ४२ कोटींना बनलेला हा पूल पाडण्यासाठी त्यापेक्षा १० कोटी रुपये जास्त खर्च येत आहे. नियमांनुसार हा खर्च अजय इन्फ्राकडून वसूल केला जाणार आहे.
एकतर पुलाचा वापर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व्हायला हवा होता, परंतू पूल बांधताना प्रचंड कोंडीचा त्रास नागरिकांना झाला आहेच, पण आता पूल असल्याचाही त्रास आणि तोडतानाचाही त्रास अहमदाबादच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.