नवी दिल्ली : ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळासंबंधीची माहिती आता समोर येत आहे. पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला असून देखभाल करण्यासाठी रोज 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची देखभाल करण्यासाठी 15 वर्षांचा विचार केल्यास 657 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. हाच खर्च वर्षाला 43.8 कोटी रुपये होतो. त्यामुळे पुतळ्याच्या देखभालीसाठी दररोज 12 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. पुतळ्याची देखभाल करण्यासाठी ओएनजीसी, एचपीसीएल, बीपीसीएल, इंडियन ऑइल आणि ऑइल यांनी मिळून 146 कोटीपेक्षा जास्त रुपये जमा केले आहेत. ही रक्कम त्यांना सीएसआर (Corporate social responsibility) च्या माध्यमातून मिळाली आहे. सरासरी पाहिले तर सीएसआरच्या माध्यमातून मिळणारी ही रक्कम शाळा किंवा रुग्णालये बांधण्यासाठी खर्च केली जाते.
दरम्यान, सीएसआरमध्ये मोठ्या व्यापाऱ्यांना एक सामाजिक देणगी द्यावी लागते. व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायात झालेल्या फायद्यातील दोन टक्के रक्कम समाजाच्या कल्याणासाठी द्यावी लागते. त्यामुळे आता अशा रकमेतून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची देखभाल करण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम 2013साली नरेंद्र मोदीगुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. ते आता पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे.