ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २६ - तामिळनाडूत खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्याक्रमाचे प्रवेश शुल्क दुप्पट झाले आहे. खासगी महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पालकांना दोन कोटीच्या आसापास रक्कम मोजावी लागणार आहे. सीबीएसईने नीटचे निकाल १७ ऑगस्टला जाहीर केल्यानंतर खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि डिम्ड विद्यापीठांनी एमबीबीएस अभ्याक्रमाच्या प्रवेश शुल्कात अव्वाच्या सव्वा वाढ केली.
मुख्य खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिविद्यार्थी एमबीबीएस शिक्षणाचा खर्च सरासरी १.८५ कोटी रुपये येईल. यात एक कोटी रुपये शिक्षण शुल्क आणि ८५ लाख कॅपिटेशन फी ची रक्कम आहे. सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि डीम्ड विद्यापीठांना मेरीटच्या आधारावरच प्रवेश देणे बंधनकारक आहे.
विद्यार्थी प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज करु शकतात मात्र नीटच्या रँकिंगनुसारच प्रवेश मिळेल. वैद्यकीय शिक्षणाचा हा खर्च परवडणारा नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत.