जबलपूर: आंबा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं तसं अवघडच. फळांचा राजा असलेल्या आंब्याला भारतातच नव्हे तर जगभरातून मागणी असते. दरवर्षी आंब्याची किंमत वाढते. पण तरीही आंबाप्रेमी आंब्यावर ताव मारतात. आंब्याचं नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग खिसा थोडा रिकामा करून आंब्याची खरेदी होते. मात्र जबलपूरमध्ये पिकणारा आंबा खिसा नव्हे, तर संपूर्ण बँक खातं रिकामं करू शकतो. जबलपूरमध्ये पिकणाऱ्या एका आंब्याची किंमत तब्बल २.७० लाख रुपये इतकी आहे. इंटरनेटवर सध्या या आंब्याची किंमत एक ते दोन लाख रुपये आहे. याबद्दल स्थानिक कृषी अधिकाऱ्याना विचारलं असता, त्यांनी आंब्याच्या बगिच्यात जाऊन पाहणी करणार असल्याचं सांगितलं. जपानी आंबा तामागो नावानं ओळखला जातो. भारतात इतर कुठेही या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच त्याला मिळणारा दरदेखील जास्त आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खाणाऱ्या आंब्याला जपानी भाषेत 'ताईयो नो तामागो' म्हणतात. भारतात आंब्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील हापूस आंबा सर्वाधिक महागडा आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जपानचा आंबा सर्वात महाग विकला जातो. आता तामागो आंबा मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्येदेखील पिकू लागला आहे. चरगवामध्ये वास्तव्यास असलेल्या संकल्प परिहार यांनी तामागो आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. संकल्प यांनी ४ एकरावर आंब्यांच्या १४ विविध प्रजातींची लागवड केली आहे. त्यांनी तामागो आंब्याची ५२ झाडं लावली आहे.
बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 2:11 PM