लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अधिक उत्पन्न देणाऱ्या, बदलत्या हवामानास अधिक अनुकूल व बायो-फोर्टिफाइड १०९ बियाणांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला अर्पण केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्त्वाचे आहे. या उपक्रमाचा उद्देश कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या जाती भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केल्या आहेत आणि त्या एकूण ६१ पिकांच्या आहेत. त्यापैकी ३४ शेतातील पिके आणि २७ बागायती पिके आहेत. पंतप्रधानांनी शेतकरी, शास्त्रज्ञांशी यावेळी संवादही साधला.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण ६१ पिकांच्या १०९ जातींचे बियाणे जारी करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, उत्पादनात वाढ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल. ते म्हणाले की, या पिकांचे बियाणे हवामानास अनुकूल असून प्रतिकूल हवामानातही चांगले पीक देऊ शकतात. ते म्हणाले की, या जातींमध्ये भरपूर पोषकतत्त्वे आहेत.
‘जैव-फोर्टिफाइड’ वाणांवर भर
- तृणधान्ये, बाजरी, चारा, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस आणि फायबर पिके यांचा लागवडीच्या पिकांमध्ये समावेश होतो. बागायती पिकांमध्ये फळे, भाज्या, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींच्या नवीन जातींचा समावेश होतो.
- पंतप्रधानांनी ‘जैव-फोर्टिफाइड’ वाणांच्या संवर्धनावर सातत्याने भर दिला असून, कुपोषणाचा सामना करण्यासाठी माध्यान्ह भोजन योजना आणि अंगणवाडी सेवा यासारख्या सरकारी उपक्रमांशी जोडले आहे.
- ६१ पिकांशी संबंधित हे नवीन वाण कमी खर्चात उपलब्ध.
- ६१ पिकांच्या १०९ जातींचे बियाणे बाजारात.
- ३४ पिके, २७ बागायती पिकांचे नवे वाण.
- २०१४ पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारचे प्रयत्न.
लोकांना हवे आहेत सेंद्रिय पदार्थ
- मोदींनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, ६१ पिकांशी संबंधित हे नवीन वाण कमी खर्चात उपलब्ध होणार असल्याने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
- यावेळी पंतप्रधानांनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली आणि लोक पौष्टिक आहाराकडे कसे वाटचाल करत आहेत यावर भर दिला.
- नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रिय शेतीकडे सर्वसामान्यांची वाढती आवड याबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले.
- मोदी म्हणाले की, लोक सेंद्रिय पदार्थांकडे अधिक ओढले गेले असून, सेंद्रिय पदार्थांची मागणी अधिक वाढली आहे.