ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मतदान यंत्रांविरोधातील आपल्या लढाईला अधिक आक्रमक रूप देण्यास सुरुवात केली आहे. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होणे शक्य आहे. जर मतदान यंत्रे सार्वजनिक झाली तर त्यात होणारी फेरफार 72 तासांत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालांनंतर मतदान यंत्रांवर शंका घेतली होती. त्यानंतर इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून, त्यात फेरफार करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. मतदान यंत्रांना दोष देण्यापेक्षा निवडणुकीत झालेल्या पराभवाची समीक्षा करावी, असा सल्ला निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना दिला होता.
दरम्यान, केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा मतदान यंत्रावर आक्षेप घेतला. तसेच निवडणुका मतपत्रिकांचा वापर करून घेण्याची मागणी केली. तसेच मतदान यंत्रात फेरफार झालेला असेल तर तासन तास उभे राहून मतदान करण्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिक करत आहेत. असेही केजरीवाल यांनी सांगितले.