नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर देशात तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. जर प्रभावी रणनीती आणि कोविड उपाययोजनेचं पालन केले नाही तर तिसरी लाट भयंकर धोकादायक ठरू शकते. आतापर्यंत भारतात २.२ टक्के लोकसंख्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडली. आजही देशातील ९७ टक्के लोकसंख्येचं संरक्षण करण्यासाठी सावध राहिलं पाहिजे असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत लव अग्रवाल म्हणाले की, जर योग्य उपाययोजना आणि कोविडच्या नियमांचे पालन केले तर तिसरी लाट भलेही आली तरी रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ होणार नाही जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर याचा ताण पडेल. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम सध्या देशासमोर मोठं आव्हान आहे. आजही अनेक लोक लस घेण्यापासून लांब जात आहेत. ग्रामीण, आदिवासी भागात कोविड १९ च्या लसीवरून सोशल मीडियात येणाऱ्या कथा, अफवा आणि चुकीच्या अपप्रचारामुळे लस घेण्याचं टाळत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच कॉकटेल लसीचा प्रभाव आणि विविध लसींच्या डोसचं मिश्रण यावरून प्रश्न विचारला असता मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी वीणा धवन म्हणाल्या की, उपलब्ध पुराव्यानुसार, काही परिवर्तनीय नाही. या विषयावर एक पूर्ण विश्लेषण करणं बाकी आहे. कॉकटेल लसीकरण करू नये, आपल्या एकाच लसीचे डोस घ्यायला हवेत. लसीकरण केल्यानंतर ३० मिनिटं महत्त्वाची आहेत. त्यामुळे लोकांचे निरीक्षण केले जाते. लस किती काळ प्रभावी ठरेल यावर अग्रवाल यांनी सांगितले की, ६-९ महिने लसीचा प्रभाव असेल. अभ्यास केला गेला तर लसीचा बुस्टर डोस दिला जाऊ शकतो.
दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीनं गर्भवती महिलांना कोविड १९ लस घेण्याची शिफारस केली आहे. अन्य देशातही लसीचे डोस दिले जात आहे. आम्ही लवकरच याबाबत दिशा-निर्देश ठरवू. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावरही विचार केला जात आहे. प्रत्येक शीशीचा वापर ४ तासांच्या कालावधीत होणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण करणं सुरू केले नाही. परंतु घराच्या जवळ लसीकरण केंद्राची सुविधा दिली जाऊ शकते.