इंदूर: राज्यात भाजपाचं सरकार असताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे, असं महाजन म्हणाल्या. राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपाचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत, असं मला कायम वाटायचं. त्यावेळी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्द उचलायचे, असं महाजन यांनी सांगितलं. महाजन यांनी लोकसभेत आठ वेळा इंदूरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेते जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट यांनी विनम्रपणे निवेदन द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यामध्ये लक्ष घालतील, असं आश्वासन मी काँग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केलं. इंदूरचा विकास हाच ध्यास असल्यानं पक्षीय राजकारण कायम बाजूला ठेवलं, असं महाजन यांनी सांगितलं. भाजपाचे शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या कालावधीत मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला पराभव पत्करावा लागला. यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं. सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुमित्रा महाजन यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शंकर लालवाणी यांनी इंदूरमधून निवडणूक लढवत लोकसभा गाठली.
'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:33 AM