नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारपासून दोनदिवसीय राज्यपाल परिषदेला सुरुवात होणार आहे. दहशतवादविरोधी धोरण, तसेच रोजगारनिर्मिती या मुद्यांवर या परिषदेत विशेष भर राहणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या ४७ व्या परिषदेत २३ राज्यपाल, तसेच केंद्रशासित प्रदेशांचे दोन नायब राज्यपाल सहभागी होतील. यात देशांतर्गत सीमेवरील सुरक्षा, दहशतवाद, घुसखोरी, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आदी विषयांवर चर्चा होईल. शाळा शिकू न शकलेल्यांसाठी कौशल्य विकास इत्यादी मुद्यांवर या परिषदेमध्ये मंथन करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजना, सर्वांना घरकुल, स्मार्ट सिटी, उच्चशिक्षणाचा दर्जावाढ यांच्या अंमलबजावणीबाबत यावेळी चर्चा होईल. ‘मेक इन इंडिया’, पूर्वोत्तर राज्यांच्या विकासांचा वेग वाढविण्यासंदर्भातदेखील सल्ले देण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रपती भवनातर्फे देण्यात आली आहे. या परिषदेला उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ मंत्री व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (वृत्तसंस्था)
राज्यपालांची आजपासून परिषद
By admin | Published: February 09, 2016 3:54 AM