ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - गेल्या काही दिवसांमध्ये एकीकडे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खांद्यावरुन मृतदेह वाहून न्यावे लागत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना बेल्लारी महापालिकेच्या नगरसेवकाने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. नगरसेवक गोविंदराजुलू एम गेल्या कित्येक वर्षांपासून मृतेदह आपल्या स्वत:च्या गाडीने स्मशानापर्यंत पोहोचवत गरिबांची मदत करत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते अजिबात पैसे घेत नाहीत, आणि मुख्य म्हणजे ते स्वत: गाडी चालवतात.
अशाप्रकारे गरीब आणि गरजूंना मदत करावी असं का वाटलं विचारलं असता गोविंदराजुलू यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगितल्या ज्यामुळे त्यांना हे समाजकार्य करण्याची याची प्रेरणा मिळाली. सुरुवातील त्यांनी 10 वर्षांपुर्वीची एक घटना सांगितली. 'भिंत पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह घेऊन जाणं त्याच्या कुटुंबाला शक्य होता नव्हतं. त्यांना असं असहाय्य झालेलं पाहून मला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली', असं ते सांगतात.
अजून एक आठवण जागी करताना गोविंदराजुलू यांनी सांगितलं की, 'काही वर्षांपुर्वी रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील सात लोकांचा मृत्यू झाला होता. माझ्या एका मित्राने मला यासंबंधी माहिती दिली होती. पण सर्वात कठीण परिस्थिती तेव्हा होती जेव्हा मी त्यांच्या निधनाची बातमी देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मी घरी पोहोचलो तेव्हा त्यांची आई टीव्ही पाहत होती, त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती. मी कसंतरी त्यांना अपघातस्थळी घेऊन गेलो. त्यांचं ते दुख: मी शब्दात व्यक्त करु शकत नाही'.
अजून एका घटनेचा त्यांनी यावेळी उल्लेख केल. त्यांनी सागंतिलं की, 'एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मी तिथे पोहोचलो. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होती, तर दोघेजण जखमी झाले होते. मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो पण त्यांचाही मृत्यू झाला. या घटनांनी मला अधिक भावनिक बनवलं. त्यामुळे लोकांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी तरी मदत करावी असं मी मानतो. नाहीतर आपलं हे जीवन व्यर्थ आहे'.