श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाच देश ठरणार आहे.
आज सकाळी 6.51 वाजता 20 तासांसाठी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी सांगितले की, आतापर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. चांद्रयान-2 ला इस्त्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही -MK-3 अंतराळात घेऊन झेपावणार आहे.
(चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी)
चांद्रयान-2 मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही -MK-3 अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे. चांद्रयान-2च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल.
'चांद्रयान-2'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी 15 जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान 2 मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग पुणे येथीलइंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.
(UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप)
भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!नजीकच्या भविष्यात स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना असून यानाने पहिला अंतराळवीर अंतरिक्षात पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम ऑगस्ट 2022 मध्ये पार पाडल्यानंतर अंतराळतळाची योजना राबविण्याची तयारी जोमाने सुरू केली जाईल, असे भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. ‘गगनयान’ मोहीम पार पडल्यानंतर अंतराळ तळ उभारणीच्या योजनेचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला जाईल. अंतराळात अल्प गुरुत्वाकर्षणात नानाविध प्रयोग करण्यासाठी आपलाही स्वतंत्र अंतराळ तळ असावा, ही भारताची महत्त्वाकांक्षा आहे. तिला मूर्त रूप देण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातील, असेही डॉ. शिवन यांनी सांगितले होते.