नकली नोट : शिक्षा
By admin | Published: October 03, 2015 12:20 AM
हजारच्या नकली नोटा
हजारच्या नकली नोटाचालवणाऱ्या महिलेला कारावासनागपूर : उमरेडच्या बाजारपेठेत हजाराच्या नकली नोटा चालवून खळबळ उडवून देणाऱ्या एका महिलेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ताजमिरा रुबेल मिया (२८), असे आरोपी महिलेचे नाव असून ती पश्चिम बंगाल भागातील रहिवासी आहे. प्रकरण असे की, उमरेडच्या इतवारी पेठेत राजेंद्र पांडुरंग पिसे यांचे पांडुरंग किराणा या नावाने दुकान आहे. २४ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिसे यांच्या दुकानात गेली आणि तिने आवळा तेलाची ८० रुपये किमतीची बाटली खरेदी केली. त्यासाठी तिने एक हजारची नोट दुकानदाराला दिली होती आणि त्याने तिला ९२० रुपये परत केले होते. पिसे यांना या नोटेची शंका आली होती. ही महिला पिसे यांच्या शेजारच्या मुरलीधर गोविंदानी यांच्या दुकानात गेली होती. या ठिकाणाहून तिने ६५ रुपयांची बॉडी लोशन बाटलीची खरेदी करून हजाराची नोट दिली होती. दुकानदाराने तिला ९३५ रुपये परत केले होते. नोटांबाबत संशय निर्माण होताच दुकानदारांनी तिला दुसऱ्या नोटा मागितल्या होत्या. परंतु तिने त्याकडे लक्ष न देता घाईने जाणे सुरूच ठेवले होते. लोकांनी तिच्या सभोवताल गराडा घालून नोटा बदलवून मागितल्या होत्या. परंतु तिने दुसऱ्या नोटा नसल्याचे सांगितले होते. लोकांनी तिची पिशवी तापासली असता त्यांना हजाराच्या तीन नोटा आढळल्या होत्या. काहींनी लागलीच उमरेड पोलिसांना फोनवर सूचना दिली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून या महिलेला नकली नोटांसह ताब्यात घेतले होते. उपनिरीक्षक सुरेश मांटे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन भादंविच्या ४८९ (ब) कलमांतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड, भादंविच्या ४८९ (सी) कलमांतर्गत २ वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर, आरोपीच्या वतीने ॲड. सी.जी. बारापात्रे यांनी काम पाहिले. सहायक निरीक्षक तवाडे, एएसआय अरुण भुरे आणि नायक पोलीस शेषराव मेश्राम यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.