नवी दिल्ली : १२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त ३३ हजार व्यक्ती परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या - निरीश्वरवादी असल्याची माहिती जनगणनेच्या आकडेवारीतून पुढे आल्याने हा देश श्रद्धावानांचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.हे गुणोत्तर पाहिले तर ईश्वर न मानणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे ०.००२७ टक्के आहे.सन २०११च्या जनगणनेत ज्यांनी स्वत:ची निरीश्वरवादी म्हणून नोंद केली आहे त्यापैकी सुमारे निम्म्या महिला आहेत व ईश्वरावर श्रद्धा नसलेल्या १० भारतीयांपैकी सात भारतीय ग्रामीण भागात राहणारे आहेत.देशभरात निरीश्वरवादी म्हणून नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक ९,६५२ व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. त्यातही महिला (४,६०८) पुरुषांच्या (५,०४४) जवळजवळ बरोबरीत आहेत. महाराष्ट्रील निरीश्वरवाद्यांपैकी ७१ टक्के खेड्यांमध्ये राहणारे आहेत. शेजारच्या गोव्यात ४७ पुरुष व व १४ महिलांसह एकूण ६१ निरीश्वरवाद्यांची नोंद झाली आहे.जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. प्रत्येक जनगणनेत माहिती घेताना हा प्रश्न विचारला जातो. अशा जनगणनेतून देशातील निरीश्वरवाद्यांचा आकडा समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीच्या सन २००१च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीत निरीश्वरवाद्यांचा कोणताही नेमका आकडा नमूद न करता फक्त ‘फारच थोड्या लोकांनी आपण निरीश्वरवादी असल्याची नोंद केली,’ असे मोघमपणे नमूद करण्यात आले होते.निरीश्वरवाद्यांमध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल मेघालयचा (९,०८९) दुसरा क्रमांक लागतो. ईश्वर आणि धर्माचे पूर्णपणे वावडे असलेल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या सत्तेत दीर्घ काळ राहिलेल्या केरळ या राज्यात ४,८९६ निरीश्वरवादी नोंदले गेले. त्या तुलनेत पश्चिम बंगालमधील निरीश्वरवाद्यांची संख्या खूपच कमी म्हणजे ७८४ आहे. याखेरीज निरीश्वरवाद्यांची संख्या चार अंकी असलेल्या इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (२,४२५) व तमिळनाडू (१,२९७) यांचा समावेश आहे. मध्यंतरी सन २०१२मध्ये जगभरातील लोकांच्या धार्मिकतेचा मागोवा घेऊन एक जागतिक निर्देशांक काढण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडा जास्तही असू शकतो-जनगणनेत जी नोंद झाली तेवढेच निरीश्वरवादी भारतात असतील, असे खातरीने म्हणता येणार नाही. जनगणना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापेक्षा कितीतरी जास्त लोकांनी (सुमारे २९ लाख-०.२४ टक्के) आपला धर्म सांगितला नाही किंवा धर्माची इतर गोष्टींशी गल्लत केली. -अशा लोकांची ‘धर्म सांगितला नाही’ या वर्गवारीत नोंद केली गेली. त्यामुळे ज्या निरीश्वरवाद्यांनी धर्म सांगितला नाही त्यांच्यापैकी काहींना या वर्गवारीत गणले गेले असू शकते. - शिवाय जनगणनेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून माहिती न घेता एकाच वडीलधाऱ्या व्यक्तीकडून घरातील सर्वांची माहिती घेतली जाते. त्यामुळे कुटुंबातील तरुण पिढी धर्म व देव न मानणारी असली तरी कुटुंबप्रमुख सरकारी नोंदीत ते नोंदवून घेईलच, असे सांगता येत नाही.
१२० कोटी लोकांचा देश; निरीश्वरवादी फक्त ३३ हजार!
By admin | Published: July 29, 2016 1:38 AM