ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 11 - देशामध्ये गेल्या 10 वर्षात मांसाहार करणा-यांची संख्या घटली असून शाकाहार करण्यावर लोक भर देत असल्याचं दिसत आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. 2004 मध्ये देशभरात 75 टक्के लोक मांसाहार करत होते मात्र ही टक्केवारी घटली असून 2014 मध्ये 71 टक्क्यांवर पोहोचली आहे.
मांसाहार करणा-यांमध्ये तेलंगणा राज्य सर्वात पुढे असून 99 टक्के लोक मांसाहार करतात. रजिस्टार जनरल ऑफ इंडियाने 15 वर्ष वयोगटापासून ते पुढील वयोगटातील लोकांवर हे सर्वेक्षण केलं आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही केलेल्या सर्व्हेक्षणात तेलंगणामधील 98.8 टक्के पुरुष तर 98.6 टक्के महिला मांसाहार करतात ही माहिती मिळाली आहे.
तेलंगणानंतर पश्चिम बंगाल दुस-या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे तिस-या क्रमांकावर आंध्रप्रदेश, चौथ्या क्रमांकावर ओडिसा तर पाचव्या क्रमांकावर केरळ राज्य आहे. शाकाहार करणा-यांमध्ये राजस्थान, पंजाब आणि हरियाणा राज्य सर्वात पुढे आहेत.