भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 10:14 AM2023-05-07T10:14:48+5:302023-05-07T10:15:42+5:30
सोनिया गांधींचा हल्लाबोल : काळ्या राजवटीविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन
हुबळी : कर्नाटक आणि एकूणच भारत सत्ताधारी पक्षाच्या लूट, लबाडी, अहंकार, द्वेष यातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती करू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारच्या काळ्या राजवटीविरोधात आपला आवाज मजबूत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
चार वर्षांनी त्यांनी प्रथमच प्रचार सभा घेतली. त्यावेळी भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही द्वेष पसरविणाऱ्यांच्या विरोधात होती. भाजपच्या लूट, लबाडी, अहंकार आणि द्वेषाच्या वातावरणातून मुक्त झाल्याशिवाय कर्नाटक किंवा भारत दोन्हीही प्रगती करू शकत नाही.
सोनिया गांधी यांनी आरोप केला की, दरोडे टाकणे हा सत्तेतील लोकांचा व्यवसाय झाला आहे. भाजपने दरोडा टाकून सत्ता हस्तगत केली आहे.
कर्नाटकचे लोक कोणाच्या आशीर्वादावर अवलंबून नाहीत...
सोनिया गांधी म्हणाल्या की, ते म्हणतात की जर ते जिंकले नाहीत तर कर्नाटकला पंतप्रधान मोदी यांचा आशीर्वाद मिळणार नाही, दंगली होतील. तुम्ही कर्नाटकातील जनतेला लाचार समजू नका. कर्नाटकचे लोक कोणाच्या आशीर्वादावर अवलंबून नाहीत तर त्यांच्या मेहनतीवर त्यांचा विश्वास आहे. कोणत्याही नेत्याच्या आशीर्वादाने जनतेचे भवितव्य ठरत नाही.
दहशतवाद मला चांगला समजतो : राहुल गांधी
माझी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. अशा परिस्थितीत मला पंतप्रधान मोदींपेक्षा दहशतवाद चांगला समजतो, अशा शब्दात काँग्रेसचे
नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पलटवार केला.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधला. समाजाला उद्ध्वस्त करण्याच्या ‘दहशतवादी प्रवृत्ती’सोबत हा पक्ष उभा असल्याची टीका काँग्रेसवर केली होती. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला येथे एका सभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी कर्नाटकातील तरुणांना सांगावे की त्यांनी गेल्या तीन वर्षांत राज्यातील ४० टक्के कमिशन विरोधात काय केले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान कर्नाटकात येतात. पण, भ्रष्टाचारावर एक शब्दही काढत नाहीत. गॅस सिलिंडर पूर्वी ४०० रुपयांचे होते.
मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाचा निर्णय मान्य असेल : शिवकुमार
काँग्रेस कर्नाटकात किमान १४१ जागा जिंकेल आणि मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाचा निर्णय मान्य असेल, असे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्यासाठी पक्ष आधी आणि मुख्यमंत्रिपद नंतर आहे.