सध्या संसदेचे अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेसवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
लोकसभेब बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुलसीदासजींनी म्हटले आहे - 'झूठई लेना, झूठई देना, झूठई भोजन, झूठ चबेना'. काँग्रेसने खोटेपणाला राजकारणाचे शस्त्र बनवले आहे. काँग्रेसच्या तोंडाला खोटेपणा लागला आहे. जसे एखाद्या नरभक्षक प्रण्याच्या तोंडाला रक्त लागते, तसेच काँग्रेसच्या तोंडाला खोटेपणाचे रक्त लागले आहे."
मोदी म्हणाले, "देशाने 1 जुलै रोजी खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलै रोजी लोक आपल्या बँक खात्यात 8,500 रुपये आले की नाही? हे बघण्यासाठी गेले होते. या खोट्या नॅरेटिव्हचा परिणाम बघा, याच निवडणुकीत काँग्रेसने देशवासीयांची दिशाभूल केली. माता-भगिनींना दरमहा साडेआठ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन, या माता-भगिनींवर जो आघात झाला आहे ना, तो श्राप बनून काँग्रेसला बरबाद करणार आहे.
मोदींनी काँग्रेसच्या खोटेपणाचा पाढाच वाचला -मोदी पुढे म्हणाले, "ईव्हीएमसंदर्भात खोटं बोलणे, संविधानासंदर्भात खोटं बोलणे, आरक्षणासंदर्भात खोटं बोलणे, यापूर्वी राफेलसंदर्भात खोटं बोलणे, एचएएलसंदर्भात खोटं बोलणे, बँकांसंदर्भात खोटं बोलणे, कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्नही झाला." एवढेच नाही तर, "हिम्मत एवढी वाढली की, काल सभागृहाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. अग्निवीरसंदर्भात सभागृहात खोटे बोलले गेले. काल येथे प्रचंड खोटे बोलले गेले," असेही मोदी म्हणाले.