ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - सध्या देशात अस्वस्थेचे वातावरण आहे, व्यक्तीचे नाव विचारण्यापूर्वी त्याचा धर्म विचारला जातो, आधी असे नव्हते असे सांगत ज्येष्ठ लेखक, कवी व गीतकार गुलजार यांनी देशातील सध्या असहिष्णू वातावरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशात कोणाला रामराज्य आलेलं दिसतं आहे, ज्यांना ते दिसतयं त्यांना भेटायला मला आवडेल, असेही ते म्हणाले.
सध्या देशाता निराशेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे, यापूर्वी देशात अशी परिस्थिती नव्हती, याआधी धर्माच्या नावे देशात अशा घटना घडत नव्हत्या. आता मात्र एखाद्याचे नाव विचारण्याआधीच त्याचा धर्म विचारला जातो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया गुलजार यांनी व्यक्त केली. देशातील असहिष्णू वातावरणाचा निषेध करत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवला. लेखक आपले पुरस्कार परत करून राजकारण करत आहेत का असा सवाल विचारला असता, लेखक काय राजकारण करणार,ते फक्त आपल्या मनातीव विचार कागदावर उतरवत असतात, असे गुलजार म्हणाले.