गांधीनगर : देश नार्को दहशतवादाला तोंड देत असल्यामुळे त्याला निपटून काढण्यासाठी आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी म्हटले. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्च अँड ॲनालिसिस ऑफ ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टेन्सेजचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा केंद्रात दुसऱ्यांदा सरकार बनले तेव्हा या सेंटरला गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीशी जोडले जावे, असा निर्णय घेतला गेला होता. मला खात्री आहे की, हे विद्यापीठ दुसऱ्या राज्यांतही विस्तार करील आणि युवकांना फॉरेन्सिक सायन्समध्ये आपले योगदान देण्याची संधी मिळेल. आम्ही सायबर डिफेन्स आणि बैरिॲट्रिक रिसर्चबाबत सतत स्वावलंबी होत आहोत’, असे शाह म्हणाले.
नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाहीदेश आज नार्को दहशतवादाला तोंड देत आहे, असे सांगून शाह म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय हा देशात नार्कोटिक्स येऊ न देण्याचा आहे. आम्ही भारताला नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाही. अमित शाह यांनी अशा प्रकरणांच्या तपासासाठी वैज्ञानिक उपकरणांच्या वापराची गरज असल्याचे सांगितले. हा काळ थर्ड डिग्रीचा नाही. आम्हाला क्रिमिनल जस्टिस सिस्टिमला संघटित करावे लागेल. अशा कामात फॉरेन्सिक सायन्स महत्त्वाची भूमिका पार पाडेल. कोणत्याही प्रकरणात आमचा तपास हा जास्तीत जास्त वैज्ञानिक पुराव्यांवर आधारलेला असला पाहिजे, असे शाह म्हणाले.