नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. सर्वांचे डोळे कोरोनावरील लशीकडे लागले आहेत. अशात भारताला मोठे यश मिळाले आहे. देशाला पहिली स्वदेशी कोरोना लस मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सीन'च्या इमरजन्सी (आपतकालीन) वापराला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सीरम इंस्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लशीलाच्या इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती.
देशात कोरोना लशीच्या वापराला परवानगी देण्यासाठी आरोग्यमंत्रालयाच्या SEC (Subject Expert Committee)ची बैठक झाली. या बैठकीत सीरम इंस्टिट्यूटच्या लशीला अंतिम मंजुरी देण्यात आली. याशिवाय भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला मंजुरी देण्यावरही चर्चा झाली. लशीच्या वापराची प्राथमिक मंजुरी SECच देत असते. आजच्या बैठकीत कोविशील्ड लशीच्या इतर पैलुंवरही चर्चा करण्यात आली.
वर्ष 2021च्या पहिल्याच दिवशी, सीरम इंस्टिट्यूट तयार करत असलेल्या 'कोविशील्ड' लशीच्या इमरजन्सी वापरासाठी एक्सपर्ट कमिटीने मंजुरी दिली होती. आता, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाल्यानंतर 'कोव्हॅक्सिन' आणि 'कोविशील्ड' या दोन्ही लशींच्या वापराला सुरुवात होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट या तिघांनाही एकानंतर एक आपापले प्रेझेंटेशन द्यायचे होते. या बैठकीत लस निर्माता कंपन्यांकडून त्यांचा वापर, प्रभाव आणि यशस्वितेसंदर्भात माहिती माघवली होती. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीला सध्या अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही.
देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे "ड्राय रन" सुरू2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे "ड्राय रन" सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर आता सरकारने संपूर्ण देशातच ड्रय रन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज कोरोना लसीसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येत आहे.