नवी दिल्ली: ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्याभरापासून जेठमलानी यांची प्रकृती खालावली होती. आज संध्याकाळी लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जेठमलानी यांच्या निधनानं देशानं असामान्य वकील आणि आणि एक प्रतिष्ठीत व्यक्ती गमावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. पंतप्रधानांनी ट्विट करुन जेठमलानींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राम जेठमलानींनी न्यायालय आणि संसद अशा दोन्ही ठिकाणी मोठं योगदान दिलं. त्यांचा स्वभाव अतिशय मिश्कील आणि साहसी होता. कोणत्याही विषयावर ते अतिशय निर्भीडपणे भाष्य करायचे. कोणाचीही तमा न बाळगता राम जेठमलानी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायचे. देशात आणीबाणी लागू असताना त्यांनी सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा कायम लक्षात राहील. गरजूंना मदत करणं हा त्यांचा स्वभाव होता, अशा शब्दांत मोदींनी जेठमलानी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. मला अनेकदा राम जेठमलानी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या दु:खद क्षणी माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, असंदेखील पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील जेठमलानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जेठमलानी यांच्या निधनाचं वृत्त समजताच शहा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. आपण एका प्रतिष्ठीत वकिलासोबतच एक महान व्यक्तीही गमावली, अशा शब्दांमध्ये शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जेठमलानींच्या निधनानं कायद्याच्या क्षेत्रातील व्यक्तींचं मोठं नुकसान झालं आहे. जेठमलानी यांचं कायद्याबद्दलचं ज्ञान असामान्य होतं. त्यासाठी ते कायम स्मरणात राहतील, असं ट्विट करुन शहांनी श्रद्धांजली वाहिली.