नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाला पुढील 10 वर्षासाठी स्थिर आणि सशक्त सरकार हवं असल्याचे म्हटले. जगात, भारताची राजकीय आणि आर्थिक रणनिती आखण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केलं. सरदार पटेल मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना डोवाल यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका व्यक्त केली.
डोवाल यांनी एकप्रकारे मोदी सरकारचे समर्थनच केलं आहे. सन 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. मात्र, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे निर्णय लोकप्रिय नसतील, पण लोकांच्या हिताचे असतील. त्यासाठी देशाला पुढील 10 वर्षे स्थिर सरकार हवं असल्याचं डोवाल यांनी म्हटले. चुकीच्या घटना आणि फेक न्यूजच्या माध्यमातून देशात वातावरण खराब करण्यात येत आहे. नक्षलींकडून हिंसात्मक आणि दंगल घडवण्याचे काम केलं जात आहे. चीनच्या अलिबाबा आणि इतर काही कंपन्या किती मोठ्या बनल्या आहेत. त्याचप्रमाणे आपणही आपल्या देशातील कंपनींना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही डोवा यांनी म्हटले.