श्रीहरीकोटा : जगात सध्या अमेरिकी हवाई दलाची ‘जीपीएस’ रशियाची ‘ग्लोनास’, चीनच्या लष्करातर्फे विकसित करण्यात येत असलेली ‘बेईदाऊ’ आणि युरोपची नागरी नियंत्रणाखालील ‘गॅलिलिओ’ या समकक्ष यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांमध्ये २८ ते ३५ उपग्रह आहेत व त्या उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च आला आहे. ‘चांद्रयान’ मोहिम ‘इस्रो’ने जशी बसप्रवासाच्या खर्चात यशस्वी केली तशीच ‘आयआरएनएसएस’ ही स्वदेशी यंत्रणाही १,४५० कोटी एवढ्या तुलनेने अल्प खर्चात फत्ते झाली आहे. यात मालिकेतील प्रत्येक उपग्रहासाठी १५० कोटी रुपये व त्याच्या प्रक्षेपणासाठी ‘पीएसएलव्ही’ अग्निबाणाच्या प्रत्येक उड्डाणासाठी १३० कोटी रुपये खर्च आला. आयआरएनएसएसचा खर्च १,४५० कोटी ‘आयआरएनएसएस’ मालिकेतील याआधीच्या सात उपग्रहांचे जुलै २०१३ पासून यशस्वी प्रक्षेपण झाले असून ते उपग्रह आपापल्या भूस्थिर कक्षेत स्थिर होऊन नेमून दिलेले काम चोखपणे पार पाडत आहेत. ‘इस्रो’च्या ‘पीएसएलव्ही’ अग्निबाणाने या मालिकेतील सातव्या व अखेरच्या उपग्रहाला घेऊन दु. १२.५० वाजता झेप घेतली आणि अवघ्या २० मिनिटांत त्याने १,४२५ किलो वजनाचा हा उपग्रह अंतराळात ४८८.९ किमी उंचीवर नेऊन सोडला. येत्या काही दिवसांत या उपग्रहास नेमक्या जागी स्थिर करण्याचे काम केले जाईल व त्यानंतर सातही उपग्रहांचे एकत्रित समन्वयाने काम सुरु होईल. ‘मोहिम फत्ते झाली’, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी जाहीर करताच प्रक्षेपण केंद्राच्या नियंत्रण कक्षात उपस्थित वैज्ञानिकांनी टाळ््यांचा गजर केला.‘आयआरएनएसएस-१ जी’ हा उपग्रह पुढील एक महिन्याच्या आत जेव्हा संचालन सुरू करेल तेव्हा भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली (आयआरएनएसएस) क्षेत्रीय आणि समुद्री दिशादर्शन (नेव्हीगेशन), आपदा व्यवस्थापन, वाहनांच्या मार्गाचा शोध घेणे, प्रवासी आणि पर्यटकांच्या मार्गांचा शोध घेण्यात मदत करणे आणि वाहन चालकांसाठी दृक-श्राव्य दिशादर्शक सुविधा उपलब्ध करून देऊ शकेल.पीएसएलव्हीची ही सलग ३४ वी उड्डाण मोहीम होती. तथापि आयआरएनएसएस चार उपग्रहांसोबत आधीपासूनच सक्रिय होता. उर्वरित तीन उपग्रह त्याला अधिक अचूक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी आवश्यक होते, असे इस्रोने म्हटले आहे. आयआरएनएसएसमध्ये एकूण सात उपग्रह आहेत, जे अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिमच्या धर्तीवर दिशादर्शक प्रणालीमध्ये आधीपेक्षा अधिक अचूकतेसह सेवा प्रदान करतील. या स्वदेशी प्रणालीने भारतीय उपखंडाचा भूभाग आणि त्याच्या सभोवतालच्या १,५०० किमी प्रदेशातील दिशादर्शक माहिती २० मीटरच्या अचूकतेने मिळू शकेल.
अल्प खर्चात देशी यंत्रणा
By admin | Published: April 29, 2016 6:21 AM