नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादन विधेयकासंबंधी आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या धोरणामुळेच देशात बेरोजगारी निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोपही गडकरी यांनी केला.वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गडकरी हे सोनिया गांधी यांच्या पत्राला उत्तर देताना म्हणाले की, भूसंपादन कायद्यांतर्गत एक एकर जमीनही ताब्यात घेण्यात आलेली नाही. हा कायदा संपुआ सरकारने जलसिंचन, तसेच ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी आणलेला होता. शेतकरी सर्व काळ पावसावरच निर्भर असतात. सोनिया गांधी यांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात रालोआ सरकारने भूसंपादन कायदा एकतर्फीरीत्या लादला असून ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप केला होता. सरकार शेतकरीविरोधी असून उद्योगपतींच्या भल्यासाठीच ते झुकले आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. खुली चर्चा व्हावी लोकशाहीत कल्याण योजनांबाबत खुली चर्चा व्हायला हवी. लोकांनी अशा चर्चेपासून दूर जायला नको, असेही सांगत गडकरींनी सोनियांना दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचे स्मरण करवून दिले. एखादा प्रकल्प पाच वर्षांत अस्तित्वात न आल्यास जमीन मूळ मालकाला देण्याची तरतूद नसल्याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले होते. उत्तरात गडकरी म्हणाले की, अशा योजनांमुळे सिंचन आणि गृहनिर्माणासारख्या योजनांना बाधा पोहोचेल. जलसिंचन आणि गरिबांसाठी घरांसारख्या योजना पाच वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याने ही अट काढून टाकली जावी, अशी सूचना महाराष्ट्र आणि हरियाणातील तत्कालीन काँग्रेस सरकारांनी केली होती.संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गावांना वीज आणि शेतीला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले. संपुआ सरकारने रस्ते, वीज, सिंचन प्रकल्पांसाठी असलेला पैसा मतदारांना आमिष दाखविणाऱ्या लोकप्रिय योजनांवरच खर्च केल्याचा दावा यापूर्वीच्या योजना आयोगाने केला असल्याचा उल्लेखही गडकरींनी केला.
सोनिया गांधींकडून देशाची दिशाभूल
By admin | Published: March 30, 2015 11:25 PM