नवी दिल्ली - राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी फेरबदल करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर, बिहार यांसह हरयाणा, उत्तराखंड, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. बिहारचे सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांना बिहारचे राज्यपाल बनविण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या काळात राज्यपालांच्या बदल्यावरुन अनकेदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बदल्यांमुळे मोदी सरकारवर टीकाही करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, देशातील 4 राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या असून तीन नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांमध्ये उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन, सत्यदेव नारायण राव आणि बेबी राणी मौर्य यांचा समावेश आहे. बेबी राणी यांना उत्तराखंडचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मौर्य या भाजप नेत्या आणि महिला आघाडीशी जोडल्या आहेत. तर, सत्यदेव नारायण राव यांना हरयाणाचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. तर तेथील राज्यपाल तथागत राय यांची मेघालय येथे बदली करण्यात आली आहे. तर मेघालयचे सध्याचे राज्यपाल गंगाप्रसाद यांना सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये साडे तीन दशकांनंतर राजकीय राज्यपाल मिळाला आहे. सन 1984 मध्ये जगमोहन यांनी जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी शपथ घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत काश्मीरमध्ये राजकीय व्यक्तीला हे पद देण्यात आले नाही. दहशतवाद्यांनी ग्रासलेल्या या स्वर्गभूमीला नेहमीच सैन्य अधिकारी किंवा सेवानिवृत्त सनदी अधिकारीच राज्यपालपदी नियुक्त करण्यात येत होता.