नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांसोबत विविध विद्यार्थी संघटनाही या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. याबाबत विविध विचारवंतांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. देश सध्या कठीण काळातून जात आहे. विद्यार्थी वर्गांऐवजी रस्त्यावर उतरले आहेत, अशा शब्दात गावसकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. 26 व्या लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत सुनील गावस्कर यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. गावस्कर म्हणाले की, ''आमच्या देशातील काही विद्यार्थी वर्गांमध्ये अध्ययन करण्यापेक्षा रस्त्यांवर उतरले आहेत. त्यापैकी काही जण रस्त्यावर उतरल्याने रुग्णालयात दाखल झालेले आहेत. एकूणच बहुसंख्याक वर्ग अजूनही वर्गात करिअर घडवण्यामध्ये आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण एकजुटीने पुढे जाऊ शकतो. खेळ आपल्याला हेच शिकवतात. जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा जिंकतो.'' ''आपल्या देशाने याआधीही अनेक समस्यांचा यशस्वीपणे सामना केला आहे आता या परिस्थितीतूनही मार्ग काढून पुढे जाईल,'' असा विश्वासही गावस्कर यांनी व्यक्त केला.
देश अडचणीत; विद्यार्थी वर्गांऐवजी रस्त्यावर, सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 8:44 AM