दुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादवादी पार्टीचे नेते आझम खान आणि भाजपा नेत्या व केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाने या सर्वांवर प्रचारबंदी घातली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतरही बाकीच्या राजकीय नेत्यांवर काही परिणाम होताना दिसत नाही. कारण, केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. प्रियंका गांधी यांचा चोराच्या पत्नी म्हणून उल्लेख उमा भारती यांनी केला आहे.
उमा भारती मंगळवारी दुर्ग येथे प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणात सक्रीय होण्याबाबत, तसेच प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया विचारली होती. यावेळी उमा भारती यांनी माध्यमांसमोर प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. 'प्रियंका गांधी चोराची पत्नी आहे आणि देश त्यांना त्याच नजरेने पाहणार,' असे वादग्रस्त वक्तव्य उमा भारती यांनी केले.
वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार?पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. त्याचबरोबर मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांबाबतही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसने चार पथके अभ्यासासाठी वाराणसीत गेली आहेत. मात्र काँग्रेसकडून उमेदवारीच्या घोषणेबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्याचप्रमाणे अन्य सक्षम पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यात सिनेजगतातील काहींचा समावेश आहे.