पुणे : गेल्या दोन हंगामातील उच्चांकी साखर उत्पादनानंतर यंदा देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत खाली येईल. गेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठा आहे. मार्चपर्यंत ब्राझिल आणि ऑस्ट्रेलियातील साखर बाजारात येणार नाही. या संधीचा फायदा घेत कारखान्यांनी निर्यात केली पाहिजे, असे आवाहन साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण समारंभापुर्वी त्यांनी ही माहिती दिली. ‘गेल्यावर्षीच्या हंगामामधे देशात तब्बल ३३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अतिवृष्टीमुळे उसाची मोठी हानी झाली. त्यामुळे यंदा राज्यासह देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत घसरेल असा अंदाज आहे. गेल्यावर्षीचे १४४.३ लाख टन साखर शिल्लक आहे. देशाचा वार्षिक खप हा २६० लाख टन इतका आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामधे कच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये आहेत. ब्राझिल आणि इतर देशातील साखर मार्च नंतर बाजारात येईल. त्यामुळे ही संधी कारखान्यांनी सांधली पाहिजे, असे नाईकनवरे म्हणाले. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. त्या पैकी २४ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. मात्र, त्यातील १५ ते १६ लाख टनांचे करार एकट्या उत्तरप्रदेशातील कारखान्यांनी केले आहेत. साखरेचे पोते हे बँकेकडे तारण असते. त्यापोटी बँक किंमतीच्या ८५ टक्के रक्कम कारखान्यांना देते. त्यामुळे निर्यातीस अडचण येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच कारखान्यांना ब्रिज लोन देण्याची गरज असल्याचे नाईकनवरे म्हणाले. ----------------------किमान विक्री दरात होणार बदल केंद्र सरकारने गेल्या हंगामामधे साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका निश्चित केला आहे. मात्र, हा दर ठरविताना बँक खर्चाचा विचार केला गेला नाही. केंद्र सरकारने त्याचा आढावा घेण्याचे मान्य केले असून, किमान विक्री दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढतील, असे साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.
देशात २६३ लाख टन साखर उत्पादन होईल : प्रकाश नाईकनवरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 8:16 PM
केंद्र सरकारने दिली ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी
ठळक मुद्देनिर्यातीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनगेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठाकच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये