अंबिका प्रसाद कानुनगाे
भुवनेश्वर : सध्या जगाची नजर ओडिशातील पुरी येथे असलेल्या १२व्या शतकातील जगन्नाथ मंदिरावर आहे. चार धामपैकी एक असलेल्या भगवान जगन्नाथ मंदिराचे ‘रत्न भंडार’ ४६ वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रत्न भंडार दागिने, मौल्यवान वस्तूंची यादी करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी उघडण्यात आले आहे. यापूर्वी ते १९७८ मध्ये उघडण्यात आले होते. ते म्हणाले की, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य दुपारी बाराच्या सुमारास मंदिरात दाखल झाले आणि धार्मिक विधी केल्यानंतर भंडार उघडण्यात आले. रत्न भंडार उघडण्याच्या वेळी प्रमुख ११ लोक उपस्थित होते.
रत्न भंडारच्या आतील व बाहेरील दालनात ठेवलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू लाकडी खोक्यात बंद करून तात्पुरत्या सुरक्षित खोलीत ठेवण्यात येणार आहेत. या खोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.
हरवलेल्या चाव्यांवरून राजकारण
ओडिशातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्न भंडार पुन्हा उघडणे हा एक प्रमुख राजकीय मुद्दा होता. भाजपने रत्न भंडाऱ्याच्या हरवलेल्या चाव्यांवरून तत्कालीन सत्ताधारी बिजू जनता दलावर निशाणा साधत जिंकल्यास रत्न भंडार पुन्हा उघडण्याचे आश्वासन दिले होते.
ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले की, तुमच्या इच्छेने जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे उघडण्यात आले. आज तुमच्या इच्छेनुसार ४६ वर्षांनंतर रत्न भंडार दुपारी १.२८ च्या शुभ मुहूर्तावर एका महान उद्देशाने खुले करण्यात आले.
मंदिराच्या नावावर ६०,८२२ एकरहून अधिक जमीन
सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी सांभाळत आहे. पुरी मंदिराच्या बँकेत जमा केलेली रक्कम अंदाजे ६०० कोटी रुपये एवढी आहे.
रत्न भंडारात ठेवलेल्या दागिन्यांची आणि साहित्याची यादी दर तीन वर्षांनी केली पाहिजे. आता १९२६ आणि १९७८ मध्ये याद्या झाल्या; पण मूल्यांकन केले गेले नाही.
मंदिराच्या नावावर ६०,८२२ एकरहून अधिक जमीन आहे. ओडिशात ६०,४२६ एकर जमीन आहे. बंगाल, म. प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंधात ३९५ एकर जमीन आहे.