ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून देशात असलेली चलन तुटवड्याची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज सांगितले.
चलन टंचाईची झळ शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक बसली होती. त्यामुळे ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पीएसी समोर माहिती देताना पटेल म्हणाले. "ग्रामीण भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांवर आर्थिक गुप्तवार्ता विभाग आणि प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून आहेत."
त्याबरोबरच ऑनलाइन व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यासाठीही काम सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले. याआधी आठवड्याच्या सुरुवातीला पीएसीसमोर उपस्थित राहिल्यावर नोटाबंदीनंतर सुमारे 9.2 कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्याची माहिती पटेल यांनी दिली होती.