ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 24 - देशातला पहिला बहुप्रतीक्षित ग्रीन कॉरिडॉर रामेश्वरम ते मनामदुराईदरम्यानच्या रेल्वे मार्गावर खुला करण्यात आला आहे. या ग्रीन कॉरिडॉरचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. ग्रीन कॉरिडॉरमुळे भारताच्या पूर्वेकडील वाहतूक आणखी जलद होणार असून, प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आता बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ट्रॅकवर होणारं मलविसर्जन आता बंद होणार आहे.
रेल्वेमध्ये 35,104 बायो-टॉयलेट लावणार असून, त्यातील जवळपास 30 हजारांहून अधिक बायो-टॉयलेटस यंदाच्या आर्थिक वर्षात बसवणार असल्याची घोषणा सुरेश प्रभूंनी केली. गुगलच्या सहकार्यानं चेन्नई स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधाही पुरवण्यात आली आहे. ही वाय-फाय सेवा पुरवणं हा नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमाचाच एक भाग असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. यावेळी सुरेश प्रभूंनी तामिळनाडू सरकारला रेल्वेला अत्याधुनिक बनवण्यासाठी सामंजस्य करार करण्याचं आवाहन केलं आहे.
आजूबाजूच्या सर्व शेजारील राज्यांनी रेल्वे प्रशासनासोबत सामंजस्य करार केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना मी पत्रसुद्धा लिहिलं आहे. मी त्यांच्या सकारात्मक उत्तराची वाट पाहत आहे, असं वक्तव्य रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. तामिळनाडू सरकारच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयानं विशेष रेल्वे सोडण्याच्या नियमांत बदल न केल्यामुळे तामिळनाडू सरकारनं आतापर्यंत रेल्वे प्रशासनासोबत सामंजस्य करार केला नाही.