वाराणसी : देशातील जलपर्यटनाला चालना देणारा एक नवा अभिनव उपक्रम सुरू होत असून त्याअंतर्गत पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज वाराणसीत रविवारी संध्याकाळी दाखल झाले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळ्यादरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालवण्याची योजना आहे.
रविवारी हे जहाज जलमार्गाने वाराणसीच्या हद्दीत दाखल झाले. ते काशीतील एकूण ८४ घाटांपैकी शेवटच्या ‘नमो घाटा’वर उभे करण्यात येणार आहे. तेथून पुढे ते बनारस टर्मिनल (रामनगर) येथे नेले जाईल. तेथे जहाजाच्या आतील बाजूची सजावट, प्रकाशयोजना आदी कामे केली जाणार आहेत. त्यानंतर भाविकांना काशी विश्वनाथ धामचा प्रवास या जहाजातून करता येईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास स्वातंत्र्यदिनापासून जहाजाच्या फेऱ्या सुरू होऊ शकतील.
जहाजाची वैशिष्ट्ये
पर्याय म्हणून इलेक्ट्रिक इंजिनची व्यवस्था.
इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराने वायूप्रदूषणमुक्त पर्यटनाला चालना मिळणार.
कोची शिपयार्डमध्ये बांधणी.
जहाजासाठी बनारस टर्मिनलवर ५०० किलो वजनाचा हायड्रोजन निर्मिती क्षमतेचा प्रकल्प लवकरच उभारणार.