रघुनाथ पांडे, शिलाँग (मेघालय)मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या खासी या विशाल पर्वतरांगाना फोडून पूर्वोत्तरातील सात राज्यांना जोडणारा देशातील पहिला चार पदरी पर्वतीय राष्ट्रीय महामार्ग शुक्र वारी देशाला समर्पित करण्यात आला. या महामार्गामुळे आंतरराष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जाईल. दिल्ली पाटणामार्गे शिलाँग असा मार्ग जोडला गेला. भविष्यात शिलाँग ते म्यान्मार असा मार्ग बांधण्याची योजना प्रत्यक्षात येणार आहे; त्या नियोजनाचा आज श्रीगणेशा झाला.शिलाँग ते गुवाहाटी हे सहा तासांचे अंतर यामुळे तीन तासांवर आले. दररोज १२ हजार वाहने येथून जातील. आलं, बटाटे ,सफरचंदाचा व्यापार, कोळशाची वाहतूक आणि १५० कोटीने पर्यटन वाढेल. १८ नवी तांत्रिक महाविद्यालये इथे सुरु होत आहेत, त्यांना यामुळे सुविधा होईल. चार वीज प्रकल्प यामुळे वेळेत सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त होते. विशेष म्हणजे या भागाच्या केवळ रस्ते विकासावर १५ हजार कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. या राज्यांचा एवढा अर्थसंकल्पही नाही. मेघालय सरकारकडे राज्यातील रस्ते दुरु स्त करायला निधी नाही; अशावेळी केंद्र सरकार मदतीला धावून आले आणि राज्याला स्थैर्य दिले अशी प्रांजळ कबुली मेघालयाच्या उपमुख्यमंत्र्यानी दिली.शिलाँगच्या रिवॉई जिल्ह्यातील उम्मेयंन गावाच्याकडेला कोनशिलेचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले, तेव्हा या दोन्ही राज्यातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जोरबत ते बारपानी (६२ किमी) तसेच शिलांग बायपास (७४ किमी)हे दोन महामार्ग बांधले. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ असा नवा क्र मांकही दिला गेला.त्रिपुरा, आसाम, मिझोरम, मणिपूर, मेघालय, नागालँड ही राज्ये आणि प.बंगालच्या उत्तरपूर्व भागाला या मार्गाने जोडल्याने सुरक्षा, संरक्षण,पर्यटन आणि उद्योगाचे दार खुले झाले अशी भावना या भागातील जनतेची आहे. सुमारे एक हजार कोटींचे हे दोन्ही मार्ग २०१० मध्ये मंजूर झाले. २०१३ मध्ये मागील काम पूर्ण होणार होते; मात्र निम्मे काम रखडले होते. मागील १० महिन्यात ते विक्र मी गतीने पूर्ण करण्यात आले. एक मोठा व १३ लहान पूल या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे या मार्गाचे रीतसर उद्घाटन आज झाले तरी वाहतुकीची गरज लक्षात घेऊन दीड महिन्यापासून जोरबत ते बारपानी मार्ग खुला केला होता.मेघालयाचे उपमुख्यमंत्री रोह लिंगडोह, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरम रजिुजु यांनी लोकांच्या भावना खुल्या दिलाने मांडल्या. त्यांनी गडकरी यांच्या धडाडीचे कौतुक केले. दहा महिन्यांतील या मार्गाची प्रगती विलक्षण आहे. हा रस्ता म्हणजे या भागातील जनतेसाठी देणगी आहे असे सांगून १०वर्षे रखडलेले मार्ग १० महिन्यात मार्गी कसे लागतील याविषयी जनतेत उत्सुकता होती. कारण यातील ४६ दिवस पाऊस होता. पण गडकरी यांनी ते शक्य केले.देशातील रस्ते हा विकासाचा कणा असून केवळ भूसंपादनातील विलंबामुळे ३लाख ८० हजार कोटींचे प्रकल्प थांबले असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, राज्यांनी भूसंपादनातील अडचणी दूर केल्या व पर्यावरण विभागाची परवानगी दिली तर प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. देशातील २६ मोठे प्रकल्प भूसंपादनातील अडचणींमुळे रखडले आहेत. त्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेऊ.पूर्वोत्तरातील रस्ते बांधकाम इतर राज्यांच्या तुलनेत चारपट महाग असले तरी हा भाग देशाशी जोडण्याच्या कामी कोणतीच दिरंगाई सहन केली जाणार नाही. या भागासाठी स्वतंत्र राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ केंद्र स्थापन करत असून त्याचे मुख्यालय गुवाहाटीला असेल अशी घोषणा गडकरी यांनी केली.
देशातील पहिला पर्वतीय महामार्ग खुला
By admin | Published: May 01, 2015 10:40 PM