ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - कामगार कायद्यातील बदलांविरोधात देशभरातील १० प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी संप पुकारल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँक व विमा कंपन्यांमधील कर्मचारी संपावर गेल्याने ग्राहकांचे हाल होत असून मुंबईतील टॅक्सीचालकांनीही सलग दुस-या दिवशी संप सुरु ठेवल्याने प्रवाशांचे डोकेदुखी वाढली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व कम्यूनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने संपाला हिंसेचे गालबोट लागले.
कामगार कायद्यातील बदलांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांचे सुमारे १५ कोटी सदस्य बुधवारी एक दिवसाच्या संपावर आहेत. कामगार कायद्यातील बदलांविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. संपात सहभागी होणार नाही असे मुंबईतील टॅक्सी संघटनांनी सांगितले असले तरी ब-याच ठिकाणी टॅक्सी चालक संपावर गेले आहे. सलग दुस-या दिवशी टॅक्सी बंद असल्याने मुंबईतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईत पश्चिम रेल्वेवर कामगार संघटनांनी रेले रोको केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु होती.
पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेशसह सर्वच राज्यांना या संपाचा फटका बसला आहे. दिल्लीतही टॅक्सी व रिक्षाचालक संपात सहभागी झाले आहेत. कामगारांचे रक्षण करणा-या कामगार कायद्यात बदल करुन उद्योजकांना फायदा पोहोचवला जात आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर कामगार कायद्यात बदल करणे ही काळाची गरज असून यातून कामगारांचाच फायदा होईल असे भाजपाचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालमध्ये संपाला हिंसक वळण लागले असून मुर्शिदाबाद येथे कम्यूनिस्ट पक्ष व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला.