बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : हरयाणामध्ये विवाह झाल्यानंतर दोनच दिवसात पती व पत्नीमध्ये इतके मतभेद झाले की त्यांनी परस्परांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे कारण त्यांना घटस्फोट देण्यासाठी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने मान्य केले. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करू नये, हा नियमही या प्रकरणात उच्च न्यायालयाने बाजूला ठेवला. हरयाणातील गुरुग्राम येथील ही घटना आहे. या दोघांचा विवाह यंदाच्या १५ फेब्रुवारी रोजी झाला होता. दोनच दिवसात त्यांच्यातील मतभेद इतके वाढले की, पत्नीने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पती व पत्नी यांनी सहमतीने गुरुग्राम येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्याबरोबरच आणखी एक अर्ज करण्यात आला. त्यात म्हटले होते की, विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू नये, या नियमातून आम्हाला वगळण्यात यावे.
घटस्फोट मंजूर...
कुटुंब न्यायालयाच्या निकालाविरोधात मग या पती-पत्नीने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करून उच्च न्यायालयाने या दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास मंजुरी दिली.