धक्कादायक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:25 AM2022-04-05T08:25:55+5:302022-04-05T08:27:06+5:30
लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला.
नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. लग्नाचं फोटोशूट करणं एका नवं दाम्पत्याच्या जीवावर बेतलं आहे. लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला. त्यामुळे नव दाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. केरळमधील (Keral News) जानकीकाडूनजवळील कुट्टियाडी नदीच्या किनारी ही घटना घडली आहे. सोमवारी येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते.
फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. 14 मार्च रोजी दोघं लग्न बंधनात अडकले होते. नवरदेवाचं नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.
पेरूवन्नमुझी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते. आणि ते उत्साहाच्या भरात नदीत जातात. रेजिलला पोहता येत नव्हतं. खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. तपासाअंती घडलेल्या प्रकाराबद्दल नेमकं सांगता येईल. नवरदेवाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने अनेक कारणांमुळे आऊटडोर वेडिंग शूट 4 एप्रिलपर्यंत पोस्टपोंड करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून फोटोशूट सुरू केलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.