नवी दिल्ली - लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. एका एक्स्प्रेसचे अचानक दोन भाग झाले आणि यातील एक भाग रुळावर धावत राहिला तर एक जागीच उभा राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपलिंग तुटल्याने सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस ही अचानक (SaptKranti Express) दोन भागात विभागली गेली. यानंतर अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कंट्रोलमध्ये याबाबत सूचना दिली गेली.
सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या सावधगिरीमुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे. आनंद विहार येथून मुझफ्फरपूरकडे जाणारी सप्तक्रांती सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 10:45 ला लखनऊला येते आणि 10 मिनिटांनी बिहारच्या मुझफ्फरपूरकडे निघते. मात्र, काकोरी स्टेशनवर येताच दोन कोचला जोडणारी कपलिंग अचानक निघाली. यामुळे अर्धी ट्रेन मधूनच वेगळी होऊन पुढे निघून गेली आणि अर्धी मागेच राहिल्य़ाची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
गार्डच्या सुचनेनंतर जवळपास एक किलोमीटर पुढे गेलेल्या ट्रेनच्या चालकाने ट्रेन थांबवण्यासाठी कंट्रोल रुमला संपर्क केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमन आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर रात्री उशिरापर्यंत कपलिंग जोडण्याचं काम सुरू होतं. लखनऊचे डीआरएम एनआर संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमध्ये साधारण कपलिंग लावली गेली होती, जी अचानक तुटली. यामुळे ट्रेनचा पुढील भाग बराच पुढे निघून गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! इंजिनवरील ताबा सुटला, 70 प्रवासी असलेली ट्रेन अचानक उलट दिशेने धावली अन्...
काही दिवसांपूर्वी उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना (Train Accident) टळली होती. नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस (Purnagiri Jansatabdi) अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने धावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबवण्यात यश आले . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेसमधून जवळपास 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं असून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले होते.