कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 11:48 AM2023-03-23T11:48:49+5:302023-03-23T11:50:51+5:30
इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८ फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टमची (आयईएलटीएस) प्रश्नपत्रिका फुटली आहे. कुरिअर कंपनीतील लोकांनी ही प्रश्नपत्रिका दलालांना एक लाख रुपयांत विकल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कुरिअर कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे.
इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८ फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली. ती ९ फेब्रुवारी रोजी भोपाळला पोहोचली. ११ फेब्रुवारीस परीक्षेच्या दिवशी सकाळी ही बॅग कुरिअर कर्मचाऱ्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या हाती सुपूर्द केली होती.
मात्र, त्याआधी ही बॅग फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपास करून कंपनीच्या कर्मचारी मोहम्मद शेख शफी व कपिल या दोघांना अटक केली. दीपक नावाच्या दलालाला मोहम्मद शेख शफीने एक लाख रुपयांत ही प्रश्नपत्रिका विकली होती. या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)