मुंबई - सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा गुढीपाडव्यानिमित्त ‘हिंदू वीर’ पुरस्काराने सन्मान करण्यास सकल हिंदू समाज या संघटनेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. हा कार्यक्रम आज, रविवारी होणार आहे.
न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सत्कार कार्यक्रमास परवानगी देताना काही कठोर अटी घातल्या आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच हा कार्यक्रम आयोजित करावा लागणार आहे. हा कार्यक्रम रमजानच्या एक दिवस आधी होणार आहे.
‘’स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर, या देशातील नागरिक साक्षर आणि शहाणे होत आहेत, असे मानण्याची कारणे आपल्याकडे आहेत. या कार्यक्रमात वक्ते लोकांपुढे विचार मांडताना अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आम्ही अशा बाबींमध्ये अतिसंवेदनशील असू शकत नाही. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करण्यावर आणि ‘जगा आणि जगू द्या’ या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेवतो, असे न्यायालयाने नमूद केले.
अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी द्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी देणारे प्रतिज्ञापत्र आयोजकांनी नाशिकच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. याव्यतिरिक्त पोलिसांनी मिरवणुकीसाठी एक विशिष्ट मार्ग निश्चित करावा, जेणेकरून ती गर्दीच्या ठिकाणांवरून जाणार नाही. पोलिसांनी कार्यक्रमासाठी पुरेसे संरक्षण द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.