ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - राजस्थानातील एका मुस्लिम युवतीचे घरच्यांनी जबरदस्तीने दुस-यासोबत लग्न लागून दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्या युवतीच्या पहिल्या हिंदू पतीची भेट घालून दिल्याची घटना घडली.
युवतीच्या पहिल्या पतीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई हायकोर्टात न्यायाधीश रणजित मोरे आणि शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंठपीठासमोर राजस्थान पोलिसांनी त्या युवतीला कोर्टात हजर केले होते.
राजस्थानमधील एका गावातील अल्पसंख्याक असणारी युवती येथील हिंदू तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर या दोघांनी ८ जूनला मध्यप्रदेशीत उज्जैनमध्ये हिंदू परंपरेनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर युवतीच्या नातेवाईक मंडळींनी तिला पुन्हा सासरी पाठवतो असे सांगून मध्यप्रदेशातून राजस्थानला घेऊन गेले. त्यानंतर तिला पाठविलेच नाही, तर तिचे गुजरातमधील एका व्यक्तीसोबत दुसरे लग्न लावून दिले.
दरम्यान, तिच्या पहिला पती मुंबईत आल्यानंतर ठाण्यातील अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये माझी पत्नी गरोदर असून ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तसेच, तीचा शोध लागला तर माझाकडे परत आणण्याची मागणी केली. पोलिसांनी तिचा शोध घेताला नसल्याने त्याने हायकोर्टात Habeas Corpus याचिका दाखल करुन पोलिसांना शोध घेण्यास भाग पाडले.
मला पत्नीचा फोन आला असून तिने आपल्याला राजस्थानमध्ये कैद करुन ठेवण्यात आल्याचे सांगितले, असे याचिका दाखल करणा-या पतीने हायकोर्टात सांगितले. त्यानंतर हायकोर्टाने राजस्थान पोलिसांना त्या युवतीच्या घरी जाऊन तिला त्याच्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राजस्थान पोलिसांनी तिला २३ नोव्हेंबला हायकोर्टात हजर केले होते.
हायकोर्टात युवतीला न्यायाधिशांनी विचारले की, तु आपल्या नातेवाइकांसोबत राहणार आहेस की, Habeas Corpus याचिका दाखल केलेल्या पहिल्या पतीसोबत राहणार आहेस. यावेळी युवतीने सांगितले की, मी पहिल्या पतीसोबतच मुंबईला राहणार आहे. यावर न्यायाधिशांनी या दोघांना एकत्र राहण्याची परवानगी दिली.