ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - इंग्लंडमधून कोहिनूर हिरा भारतात आणणं अशक्य असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. केंद्राने दिलेल्या या माहितीमुळे कोहिनूर हिरा भारतात येण्याची शक्यता पुन्हा एकदा धूसर झाली आहे.
‘कोहिनूर हिरा भारतामध्ये परत आणणं शक्य नाही. कोहिनूर हिरा चोरीला गेला नव्हता किंवा जबरदस्ती करुन नेण्यात आला नव्हता. हा हिरा महाराज रणजीत सिंह यांनी ईस्ट इंडिया कंपनीला स्वत:हून दिला होता’ अशी माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. याचिका रद्द व्हावी अशी तुमची इच्छा आहे का ? असं झाल्यास भविष्यात कायदेशीर हक्क सिद्ध करणं तुम्हाला अवघड होईल असं मत सरन्यायाधीशांनी मांडलं आहे. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कोणते प्रयत्न करीत आहेत, याची माहिती देण्यासाठी न्यायालयाने सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.