नवी दिल्ली : दिल्लीतील 5 स्टार हॉटेलच्या आवारात एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या आशिष पांडे शुक्रवारी पतियाळा कोर्टात हजर झाला. यावेळी सुनावणी दरम्यान कोर्टाने आशिष पांडेचा जामीन अर्ज फेटाळत पोलीस कोठडीत रवानगी केली. आशिष पांडेला कोर्टाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काल(दि.18) दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात आशिष शरण आला होता. मात्र, न्यायाधीश धर्मेंद्र सिंह यांची सुट्टी असल्यामुळे या प्रकरणावर आज सुनावणी करण्यात आली. आशिष पांडे याने एका व्हिडीओच्या माध्यमातून काल सकाळी कोर्टासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले होते. यामध्ये तो म्हणला होता, माझ्याजवळ परवाना असलेली पिस्तुल होती. मी माझ्या सुरक्षतेसाठी पिस्तुल बाहेर काढली होती. माझी राजकीय पार्श्वभूमी असणे गुन्हा आहे का? मी बिझनेस करतो. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास, यामध्ये कळेल की कोण धमकी देत होते.
नेमके काय आहे प्रकरण?नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर आशिष पांडे याने पिस्तुलाच्या जोरावर एका जोडप्याला धमकी देत शिवीगाळ केली. शनिवारी (14 ऑक्टोबर) ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडे हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत आशिष जोडप्याला धमकावत होता. आशिषसोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.