नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी एक दोषी मुकेश सिंह याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.‘माझ्या वकिलाने माझी दिशाभूल केली असा आरोप करून त्याने मला माझे सगळे कायदेशीर उपाय बहाल केले जावेत’, अशी मागणी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने मुकेश सिंह याची याचिका ही विचारात घेण्याजोगी नाही. कारण या खटल्यात फेरविचार याचिका आणि क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्यात आलेली आहे. ‘माझ्या आधीच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी माझी दिशाभूल केली’ असा आरोप करून मुकेश सिंह याने त्याचा आधार घेऊन न्यायालयांनी दिलेले सगळे आदेश आणि राष्ट्रपतींनी फेटाळून लावलेली दया याचिका आणि त्यामुळे फेटाळली गेलेली क्युरेटिव्ह याचिकाही रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत केली होती.मुकेश सिंह याची याचिका वकील एम. एल. शर्मा यांनी दाखल केली होती. केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि वृंदा ग्रोव्हर यांनी केलेला ‘गुन्हेगारी कट’ आणि ‘फसवणूक’ यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत केली होती. २० मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय सिंह या दोषींना फाशी दिले जावे, असा आदेश ५ मार्च रोजी न्यायालयाने जारी केलेला आहे.
मुकेश सिंहची याचिका कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:34 AM