रांची: झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यासाठी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याची अट घातली आहे. अटकपूर्व जामीन हवा असल्यास, केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये ठराविक रक्कम जमा करा, असे आदेश झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना दिले आहेत. महापुरामुळे प्रचंड वाताहत झालेल्या केरळला मदतीची गरज असल्यानं न्यायमूर्ती ए. बी. सिंह यांनी तीन आरोपींना पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या. न्यायमूर्ती सिंह यांनी आरोपी उत्पल रायला अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र त्याआधी त्याला केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये 7 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले. उत्पल रायवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय ज्ञानेश्वर मंडल आणि संभू मंडल यांनाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना जामीन देण्याआधी केरळमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या.आरोपींनी पूरग्रस्तांना मदत केल्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्याचे आदेशदेखील न्यायमूर्ती सिंह यांनी दिले. झारखंड उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे हेमंत कुमार सिकरवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे. केरळमधील भीषण स्थिती लक्षात घेऊन मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील उच्च न्यायालयांनीदेखील अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली आहे.
अटकपूर्व जामीन हवाय? मग केरळमधील पूरग्रस्तांना मदत करा; हायकोर्टाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:32 PM