पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या आणि पाचव्या नंबरच्या डोरंडा कोषागार प्रकरणात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एस.के. शशी यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 जणांना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लालू यादव यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली.
''लालुंजींनी भाजपसोबत हातमिळवणी केली असती तर त्यांना राजा हरिश्चंद्र असं संबोधलं असतं. पण, ते आज भाजप आणि आरएसएसशी पंगा घेत आहेत, त्यामुळेच त्यांना तुरुंगवासाची शिक्षा'' झाल्याचं लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तेजस्वी यादव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
तेजस्वी यादव यांनी सीबीआय, ईडीवरही निशाणा साधला आहे. देशात एकमेव चारा घोटाळाच झालाय का, इतर घोटाळ्याचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी हे कुठं आहेत, असेही तेजस्वी यांनी म्हटले.
4 वेगवेगळ्या घोटाळ्यात शिक्षा
विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.