ऑनलाइन लोकमत -
अलाहाबाद, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील 10 प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत टाकल्याबद्दल न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिका-यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
वकील सुशील कुमार मिश्रा यांनी याबद्दल न्यायलयात तक्रार केली होती. गुगलवर जगातील 10 प्रमुख गुन्हेगार असं सर्च केलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही दाखवला जात आहे, अशी तक्रार सुशील कुमार मिश्रा यांनी केली होती. 'मी याप्रकरणी गुगलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. मी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती', अशी माहिती सुशील कुमार मिश्रा यांनी दिली आहे.
सुशील कुमार मिश्रा यांना कोणाकडूनच दाद मिळाली नाही तेव्हा त्यांनी मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे धाव घेतली. हे सिव्हिल प्रकरण असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. मात्र सुशील कुमार मिश्रा यांनी मुख्य न्यायदंडाधिका-यांच्या निर्णयाविरोधात आव्हान देत पुनरावृत्ती अर्ज केला ज्यानंतर त्याची याचिका स्विकारण्यात आली. 31 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.